बंगळूरू – कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यानं आपल्याच पक्षावर मोठे आरोप केले आहेत. केवळ दलित असल्यामुळेच मला आजपर्यंत मुख्यमंत्रीपद दिलं नसल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षावर हा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दावणगिरीतील एका कार्यक्रमात बोलत असताना परमेश्वर यांनी हा आरोप केला आहे. तीन वेळा मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती. मात्र केवळ दलित असल्यामुळे मला ती संधी देण्यात आली नाही. काँग्रेस पक्षात काही लोक दलितांना वर जावू देत नाहीत असा आरोप परमेश्वर यांनी केला आहे. बसवलिंगप्पा, केएच रंगनाथ, मल्लिकार्जुन खर्गे यांनाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही.
काही लोक माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. फक्त राजकीय स्तरावरच नाही तर नोकऱ्यांमध्येही पदोन्नतीसाठी दलितांवर अन्याय होतो आहे. आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे पण त्याचा फारसा फरक पडलेला नाही. नोकरीत भेदभाव झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी आत्महत्याही केल्या असल्याचा आरोपही जी परमेश्वर यांनी केला आहे.
COMMENTS