काँग्रेसच्या ‘या’ आमदारानं घेतली विखे-पाटलांची भेट, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा !

काँग्रेसच्या ‘या’ आमदारानं घेतली विखे-पाटलांची भेट, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा !

मुंबई – काँग्रेसच्या आणखी एका आमदारानं राधाकृष्ण विखे-पाटलांची भेट घेतली आहे. त्यामुळे हा आमदारही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बुलढाण्यातील चिखलीचे काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी आज राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे बोंद्रे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र ही भेट त्यांनी मतदारसंघातील कामासाठी घेतली होती अशी विखे पाटील यांन माहिती दिली आहे. परंतु भाजपा काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या संपर्कात असल्याने या भेटी मागे राजकीय कारण असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. मुंबईतील गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर महाजन आणि विखे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर विखे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर विखे हे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.मोदींच्या शपथविधीनंतर राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात विखेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

तसेच विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक तर मुंबईतून एक आणि आणखी एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाणार आहेत. यामध्ये कालिदास कोळबंकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर यामध्ये बोंद्रे यांचा देखील समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.

COMMENTS