काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील “या” मतदारसंघाची होणार अदलाबदल  ?

काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील “या” मतदारसंघाची होणार अदलाबदल  ?

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या सुरू आहे.  सरकारची अपयशे लोकांसमोर सांगण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचं काम केलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेच्या सुरुवातीलाच मतदारसंघ बदलण्याची चर्चा बरीच झाली. कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेससाठी सोडवून घ्या. काँग्रेसचा खासदार निवडणू आणला नाही तर मुंबईला फिरकणार नाही अशी घोषणाच केली. त्यामुळे कोल्हापुर मतदारसंघाची आदलाबदल होणार का याचीच चर्चा सुरू झाली आहे.

सतेज पाटील यांच्या मागणीला पाटील आणि महाडिक कुटुंबियांच्या वादाची पार्श्वभूमी आहे. सध्या कोल्हापुरचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक करत आहेत. मात्र निवडूण आल्यापासून कधीच राष्ट्रवादीचे राहिले नाहीत. जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी थेट पक्षाच्या विरोधात काम केलं. त्यामुळे ते आगामी काळात भाजपमध्ये जाऊन भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि आजही काही प्रमाणात तशी शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षभरात भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असल्यामुळे खासदार महाडिक हे पुन्हा राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मतदारसघामध्ये आहे. तसं झालं तर राष्ट्रवादीकडून तेच लोकसभेचे उमेदवार राहतील यात शंका नाही.

एकेकाळी एकमेकांचे जीवलग मित्र असलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात विस्तवही जात नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सतेज पाटील फारसे सक्रीय नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीत तर सतेज पाटील यांच्या विरोधात धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक रिंगणात उतरले आणि त्यांनी सतेज पाटील यांचा चक्क पराभवही केला. तेंव्हापासून तर पाटील महाडिक गटात टोकाचे मतभेद झाले. त्यामुळे आता पुन्हा जागा राष्ट्रवादीला राहिली तर धनंजय महाडिक हेच उमेदवार असतील या अंदाजामुळेच सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसकडे मागितली आहे. आता राष्टवादी यावर काय भूमिका घेते ते पहावं लागेल.

जनसंघर्ष यात्रेत कोल्हापुरच्या जागेची चर्चा थांबते ना थांबते तोवर सांगली जिल्ह्यातील जत विधानसभेच्या अदलाबदलीची चर्चा सुरू झाली आहे. ही जागा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र गेल्या विधानसभा निडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढले. त्यावेळी पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे विलासराव जगताप हे भाजपकडून लढले आणि जिंकले ही. तर दुस-या क्रमांकावर काँग्रेसचे विक्रम सावंत राहिले. तर राष्ट्रवादीचा उमेदवार थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेसची भावना आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगलीत बोलताना ही जागा  काँग्रेसकडेच राहील असं वक्तव्य केलं.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जतच्या जागेनंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूरची जागाही अशीच कळीचा मुद्दा झाली आहे. गेल्यावेळी दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. आता मात्र ही जागा काँग्रेसला हवी आहे. तशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी इंदापुरच्या सभेत केली. गरज पडल्यास आपण या जागेसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलू असंही चव्हाण म्हणाले. पण त्याच्या आधीच काही दिवस अजित पवारांनी ही जागा राष्ट्रवादीकडे राहील असं ठणकावून सांगितलं आहे. एकवेळ आघाडी झाली नाही तरी चालेल मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे राहील असं सांगितलं आहे. त्यामुळे या जागेवरुनही संघर्ष होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेत्यांच्या या विधानावर राष्टवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली. दोन्ही पक्ष काही जागांवर दावा सांगणार त्यात वावगं काही नाही, मात्र जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं. मात्र नेत्यांच्या या वक्तव्यामुळे जागांच्या अदलाबदलीची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे. कोल्हापुरची जागा राष्ट्रवादी सोडणार का आणि सोडली तर मग सांगलीची जागा राष्ट्रवादीकडे जाणार का याचीच कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे जत मतदारसंघ काँग्रेसकडे गेला तर मिरज मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाईल अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS