काँग्रेसचा नामांतराला विरोधच

काँग्रेसचा नामांतराला विरोधच

मुंबई : महाविकास आघाडी सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं, तेढ निर्माण करण्याचं काम नको. आमचा सत्तेत समान वाटा आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

यावर थोरात म्हणाले, शिवसेनेच्या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असेही थोरात यांनी म्हटले.

छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. आता केंद्र सरकार आणि भाजपची जबाबदारी आहे. शहराची नावं बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.

COMMENTS