कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसची रणनीती !

कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसची रणनीती !

पणजी – कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार असून जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाणार असल्याची माहिती आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज गोव्यात दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेस करणार आहे.

दरम्यान 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागांसह मोठा पक्ष ठरुनही 13 जागा मिळवलेल्या भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे कर्नाटकचा न्याय गोव्यातही लागू करावा, अशी मागणी करत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच गरज पडल्यास राजभवनात काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना हजर करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते यातिश नाईक यांनी दिली आहे.

गोवा विधानसभा 40 सदस्यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा म्हणजे 17 जागा मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे 21 हा बहूमताचा आकडा गाठत भाजपनं त्याठिकाणी सत्ता स्थापन केली.

COMMENTS