लोकसभेत मोठा फटका बसलेल्या काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे यश !

लोकसभेत मोठा फटका बसलेल्या काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे यश !

मुंबई – कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी फक्त २ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण १२२१ जागांपैकी एकट्या काँग्रेस पक्षाने ५०९ जागा जिंकल्या असून काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या धर्मनिरपेक्ष जनतादलाने १७४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ६८३ आहे तर दुसरीकडे जनतेने भाजपची केवळ ३६६ जागांवर बोळवण केली आहे.

दरम्यान या निकालानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांची पार्श्वभूमी ही वेगळी असून जनता एकाच पद्धतीने विचार करत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. १९९९ साली लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या वेळी केंद्रात भाजपचे आणि महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आले होते. जनमत हे सातत्याने बदलत असते आणि जनता प्रत्येक निवडणुकीला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते हे या निकालांवरून स्पष्टपणे दिसून येते. कर्नाटकमध्ये दिसलेले हेच चित्र महाराष्ट्रातही दिसेल असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी कर्नाटक काँग्रेसचे अभिनंदन केले.

मागील पाच वर्षात फडणवीस सरकारने कोणतेही काम केलेले नसून निव्वळ घोषणाबाजीच केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत फडणवीस सरकारची निष्क्रियता त्यांना घेऊन बुडणार असून आता या सरकारला वाचवायला कोणत्याही प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक देखील कामी येणार नाहीत. या सरकारचे सर्वच पातळीवरील अपयश पूर्णपणे माहिती असून जनता या सरकारला शिक्षा देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून सरकारने हुरळून जाऊ नये असा इशारा देऊन काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल असा ठाम विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

COMMENTS