आगरतळा – एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो त्याचा रुबाब, संपत्ती, गाडी, बंगला, अफाट जमीन, अनेक कंपन्या, आणि भले मोठे नोकर-चाकर, परंतु सध्याच्या काळातही याला एका राज्यातील मुख्यमंत्री अपवाद आहेत. ते म्हणजे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक सरकार. ईशान्य भारतातात असणाऱ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे फक्त 9,230 रुपयांची संपत्ती आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार यांना महिन्याला फक्त 5 हजार रुपये पक्षाकडून मिळतात. माणिक सरकार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना आपल्याकडे सध्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 9 हजार 230 रुपये असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान माणिक सरकार हे सध्या धनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याकडे कोणतीही जमीन अथवा घर नसल्याचे त्यांनी नामांकनपत्रात लिहिले आहे, तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात राहात आहेत. माणिक सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रोख 20,140 रुपये असून तसेच त्यांचे दोन बँक खात्यांमध्ये 1 लाख 24 हजार 101 आणि 86 हजार 473.78 रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच 2 लाख, 5 लाख आणि 2.25 लाख अशा त्यांच्या तीन कायम ठेवी आहेत व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत.
आजच्या घडीला सध्या नगरसेवकाकडेही कोट्यवधींची सपत्ती पहायला मिळते. परंतु सर्वात कमी संपत्ती असलेल्या या मुख्यमंत्र्यांची सध्या देशभर चर्चा सुरु आहे.
COMMENTS