मुंबई – मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय चर्चेनंतर घेण्यात येणार असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळातील पाच सहा मंत्र्यांची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची असून त्यामुळे त्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच राजे अंबरीश, विद्या ठाकूर, राजकुमार बडोले, विष्णू सावरा, प्रवीण पोटे या मंत्र्यांचा कारभार निष्क्रीय असल्यामुळे मंत्रिमंडळातून त्यांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलं असून पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु आज रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीमुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला असून तो अधिवेशनानंतर केला जाणार आहे.
COMMENTS