नवी दिल्ली – देशातील हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांवरुन शेतक-यांनी एल्गार केला आहे. कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी देशातील हजारो शेतकरी शक्तिप्रदर्शन करत आहेत. रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा संसदेवर धडकणार असून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होणार आहेत.
दरम्यान रामलीला मैदानावरून संसद मार्गावर हा मोर्चा निघेल. मात्र केंद्र सरकारने रात्री उशिरापर्यंत मोर्चाला आणि सभेला परवानगी दिलेली नव्हती. अडवणूक झाली तरी शेतकऱ्यांचा मोर्चा निघणारच, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रशासनानं माघार घेतली असल्याचं दिसत आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा आणि देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी कायदा मंजूर करण्याची मागणी या शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लत्रलागलं आहे.
COMMENTS