औरंगाबाद – पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्या योजना हाती घेतल्या होत्या, त्या योजना या सरकारने पुढे नेल्या नाहीत, तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु. दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या औरंगाबादेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहेत. या उपोषणाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसंच भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंचं अभिनंदन केलं. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला तो पुढं गेला पाहिजे, यासाठी लाक्षणिक उपोषण सुरु केलं. आपल्या सरकारनं घेतलेल्या योजना ठाकरे सरकारनं पुढे नेल्या नाहीत तर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभा केला जाईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तुम्हाला क्रेडिट हवा असेल तर घ्या, नाव बदलायचं तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे. योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS