“हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी”, धनंजय मुंडेंचं भाजप मंत्र्यांना प्रत्युत्तर !

“हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी”, धनंजय मुंडेंचं भाजप मंत्र्यांना प्रत्युत्तर !

मुंबई – निव्वळ आवेशपूर्ण आणि शेरो-शायरीने भाषण करून जनतेच्या पदरी काही पडणार नाही. ज्यांना विजयाचा गर्व झाला आहे त्यांची अवस्था ‘ उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा , तो जमीन पर ही गिरेगी ‘ अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. अशी जोरदार टीका विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेट सादर करताना शेरो शायरी म्हटली होती. त्यावर धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे, मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. सार्वजनिक आरोग्यासाठी केवळ 4 % तरतूद करण्यात आली आहे. बजेटमध्ये एकच बदल झाला आहे तो म्हणजे अर्थसंकल्पातून चांदा गेले आणि बांदा आले आहेत असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तीसाठी केवळ 5 % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. 9 महीन्यानंतरही 43 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आत्महत्या केलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. 100 योजना जाहीर केल्या तरी शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत असा सवालही मुंडे यांनी केला आहे. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी शासन अधिकचा निधी कसा उभारणार आहे? अल्पसंख्याकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे बेरोजगार तरुणांना स्पर्धा परिक्षा देताना GST चा कर भरावा लागत आहे. निवडक व्यापा-यांच्या LBT साठी 41 हजार कोटी रुपयांचा भार राज्याने सहन केला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अर्थमंत्र्यांच्या शेरो शायरीवर जोरदार टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाला हजारो शेतकरी आत्महत्या, वयोवृध्द शेतकरी धर्मापाटील यांची आत्महत्या, हजारोकुपोषित बालकांचे मृत्यू, कमला मील अग्नितांडवातील 14 निरपराधांचे बळी, अशी पार्श्वभूमी होती. तरीही अर्थमंत्र्यांना कविता सूचत होत्या, हे दुर्दैव असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आचार्य अत्रेंच्या ओळींमध्ये थोडा बदल करून अर्थमंत्र्यांना सुनावलं आहे.”मुले पुरताना चिता पेटताना, सूचती मनी कविता किती नाना” असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS