‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं – धनंजय मुंडे

‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं – धनंजय मुंडे

कल्याण ( ठाणे ) – सन 2014 मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. आणि ‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या पाचव्या  दिवशी  कल्याणच्या गुण गोपाळ मंदिर परिसरात आयोजित आजच्या  सभेत ते बोलत होते.

साडेचार वर्षांत प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखांची लूट केली परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीेसटीमधून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले… नोटाबंदीने या देशाचे आर्थिक कंबरडं मोडलं यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही अशी परिस्थिती असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्यातील आणि केंद्रातील प्रश्नांबरोबरच धनंजय मुंडे यांनी स्थानिक प्रश्नाकडेही लक्ष वेधले

महानगरपालिका निवडणुकांपूर्वी कल्याण-डोंबिवलीकरांना सेना, भाजपाने अनेक आश्वासनं दिली. हजारो कोटींचा निधी देण्याची स्वप्न दाखवली. मिळाला का निधी? तुम्हीच ठरवा पुन्हा तिच चूक करणार की परिवर्तनात आम्हाला साथ देणार? असा सवाल केला.

कल्याण-डोंबिवली शहरात बरेच प्रश्न प्रलंबित आहे. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा इ. ही यादी न संपणारी आहे. कल्याण-डोंबिवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद द्या.  मी शब्द देतो, सगळे प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

‘फटाकेच आहे ते कधीतरी थांबणारच’

कल्याण-डोंबिवली सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावर अचानक सुरू झालेल्या आतीषबाजीचा संदर्भ घेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर उपहासात्मक टीका केली. ‘आवाज दाबण्याचा नवीन प्लॅन आहे का?’ असा खोडकर प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या दडपशाहीवर टीका केली. आणि ‘फटाकेच आहे ते कधीतरी थांबणारच’ असं म्हणत सरकारच्या गच्छंतीचे संकेत दिले.

संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार जगन्नाथ शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आदींसह कल्याण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS