वॉटरग्रीडमधून बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची सरकारने चेष्टा केली- धनंजय मुंडे

वॉटरग्रीडमधून बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची सरकारने चेष्टा केली- धनंजय मुंडे

बीड, परळी – मराठवाड्यातून धरणे पाईपलाईनने जोडुन पाणी प्रश्न सोडविण्याच्या महत्वकांक्षी वॉटरग्रीड योजनेमधून बीड जिल्ह्याला वगळून सरकारने दुष्काळग्रस्त मराठवाड्याची चेष्टा केली असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळीत गोपीनाथगडावर येवुन बीड जिल्ह्याचा या योजनेत समावेश करू असे आश्वासन देणार्‍या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी मुख्यमंत्री महोदय, क्या हुआ आपका वादा? असा सवाल केला आहे.

राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या धरणे पाईपलाईनने जोडण्याच्या वॉटरग्रीड योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.03 जुन 2019 रोजी परळी येथील गोपीनाथगडाच्या कार्यक्रमात जाहीर केले होते. मात्र जिल्ह्याला वॉटरग्रीड योजनेतून वगळून मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे स्पष्ट झाले असून, पहिल्या टप्प्यात केवळ मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांचाच समावेश करण्यात आला आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक पाणी टंचाई बीड जिल्ह्यात आहे, दुष्काळी जिल्ह्यातील 11 तालुके पाणी टंचाईने त्रस्त असताना बीड जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला नाही. वॉटरग्रीडच्या माध्यमातून जायकवाडी, माजलगाव, लोअर दुधणा, येलदरी, विष्णुपूरी, मांजरा, मणार आणि सिध्देश्वर या प्रमुख प्रकल्पांसह काही मध्यम आणि लघु प्रकल्प यांना जोडण्याचे धोरण वॉटरग्रीड मध्ये होते. मात्र पहिल्या टप्प्यातून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील जनतेमध्ये आपल्याला फसवले गेल्याची भावना निर्माण झाली असून, बीडला वगळून तेथील जनतेच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असल्याची टीका श्री.मुंडे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून भिषण दुष्काळ आहे, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, शेती पिकत नसल्याने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत. असे असतानाही सरकारने बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्याला वॉटरग्रीड योजनेतून वगळले तरी इथल्या पालकमंत्री गप्प का ? असा सवाल उपस्थित करून या प्रकरणी आपण आवाज उठवणार असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.

COMMENTS