सोलापूर – जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिलीप सोपल यांनी त्यांचा काळातील एक आठवण सांगितली आहे. शेतक-यांच्या प्रती आत्मियता असल्यामुळे शरद पवार यांना कशाप्रकारे खोटं बोलून शेतक-यांना अनुदान मिळवून दिलं याबाबतचा अनुभव त्यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान सांगितला आहे. राज्यात आघाडी सरकार असताना महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. सकाळी ७ वाजता पवार साहेबांचा फोन आला, म्हणाले, सांगोला तालुक्यात जा आणि तिथे दुष्काळाची काय परिस्थिती आहे ते सांगा. मी सांगोल्यात एका शेतात गेलो थोडं हाताने माती सरकवली आणि चार बोटावर ओल दिसली. तसं दिसूनही पवार साहेबांना म्हटलं खुप दुष्काळ आहे. इथ काहीच पाऊस नाही असं सागंताच पवार साहेबांनी दुष्काळी अनुदान मंजूर केलं. खोटं बोललो पण शेतकऱ्यांच्या हितासाठी बोललो असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अनुदान काय आपल्या खिशातून जातं काय? असा सवाल करत बार्शीचे आमदार सोपल यांनी आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना कसे अनुदान मिळवून दिले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मेळाव्यात सांगितले आहे.
दरम्यान आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रती प्रामाणिक आणि अत्मियेता असणारं होतं. आताच्या सरकारला आम्ही ३ वर्षापासून दुष्काळ निधीसाठी भांडतोय. चर्चेत तर कोट्यवधी आकडे मंजूर झालेले सांगतात. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच मिळत नाही. हे फक्त आश्वासन देणारं सरकार असल्याची टीका त्यांनी वैराग येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मेळाव्यात केली आहे.
COMMENTS