कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आणखी सहा कोटी पाच लाखांचा निधी मंजूर – पालकमंत्री धनंजय मुंडे

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आणखी सहा कोटी पाच लाखांचा निधी मंजूर – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ६ कोटी ५ लाख २ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

आतापर्यंत बीड जिल्ह्यात वार्षिक विकास योजनेतून कोरोना संदर्भातील विविध प्रतिबंधत्मक उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अन्य सुविधांसाठी ४ कोटी ६३ लाख ७५ हजार एवढा निधी देण्यात आला असून बीड जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्ड साठी स्वतंत्र ८१ लाख रुपये इतका निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे.

दरम्यान गेल्या दोन महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यातील स्थलांतरित नागरिकांची आवक हजारोंच्या संख्येने झालेली आहे. त्यादृष्टीने संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय योजना, व्यापक जनजागृती यासह मुबलक औषधोपचारांचा साठा यासह अन्य साधनांची गरज भासणार आहे.

या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन मुंडे यांनी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ६ कोटी ५ लाख २ हजार रुपये एवढा निधी आता या उपाययोजनांसाठी मंजूर केला आहे. तसेच कोरोना संदर्भातील प्रतिबंधत्मक उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही मुंडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सद्यस्थिती आटोक्यात पण संयम आणि काळजीची गरज

दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. परंतु धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने संयमाने या संकटाचा सामना करायचा आहे.

जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेला या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नाही. शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचना आपल्या हितासाठी असून त्यांचे काटेकोर पालन करावे, आपल्या व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी घरात राहून शासनाला सहकार्य करावे. असे आवाहनही यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS