जळगाव – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या कार्याचा सर्वपक्षीय गौरव सोहळा गुरुवारी पार पडणार आहे. सतीश पाटील यांच्या 61 निमित्त त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राज्यातील विविध पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, तसेच भाजपचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजीमंत्री सुरेश जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, हे एकाच मंचावर दिसणार आहेत.
दरम्यान हा कार्यक्रम जरी सतीश पाटलांच्या गौरवासाठी अयोजित करण्यात आला असला तरी या कार्यक्रमात उपस्थित असलेले विविध पक्षातील काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपचे नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेनं सध्या राजकीय वर्तुळात हडकंप झाल्याचं दिसत आहे.
एकनाथ खडसे गेली काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याचं दिसत आहे. पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन व्यवहारात पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोपामुळे गेली दीड वर्षांपासून एकनाथ खडसे महसूलमंत्रीपदापासून दूर आहेत. तसेच खडसेंच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीनं अहवाल सादर केला आहे. परंतु हा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खडसेंना मंत्रिमंडळापासून आणखी काही दिवस दूर रहावं लागणार आहे. त्यातच नारायण राणेंची वर्णी मंत्रिमंडळात लागणार असल्यामुळे एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत. त्यांचा हा अस्वस्थपणा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पहायला मिळाला आहे. अधिवेशनात खडसेंनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच काही प्रश्नांवर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्याही सुरात सूर त्यांचा मिसळला असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्ष बदलतील ती काय अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
COMMENTS