नारायण राणेंपाठोपाठ एकनाथ खसडेंनाही राज्यसभेवर पाठवणार ?

नारायण राणेंपाठोपाठ एकनाथ खसडेंनाही राज्यसभेवर पाठवणार ?

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी अखेर राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या राणेंची बोळवण राज्यसभेवर करण्यात आली आहे. अशातच आता भाजपवर नाराज असलेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनाही राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता भाजपला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांची नावं निश्चित झाली आहेत तर तिसरी उमेदवारी कोणाला देणार याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत आलं असल्यामुळे सध्या राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे.

तसेच एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने दबाव आणला जात आहे. खुद्द एकनात खडसे यांनीही अनेकवेळा जाहीर व्यासपीठांवर आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ खडसे यांना थेट दिल्लीत पाठवण्याची राजकीय खेळी खेळली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु भाजपचा हा प्रस्ताव एकनाथ खडसे मान्य करणार का? नाही हे मात्र त्यांच्या भूमिकेनंतरच समजणार आहे.

COMMENTS