ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर अनेक राजकीय पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, आज (दि.9) दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड कशी केली जाऊ शकते, याचे प्रात्यक्षिक आम दाखवण्यात आले. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली विधानसभेत प्रात्यक्षिक दाखवत सर्व पक्षांना ईव्हीएमवर मतदान केले आणि मशीनमध्ये सहजपणे फेरफार केली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
सौरभ भारद्वाज दिल्ली विधानसभेत ईव्हीएम घेऊन पोहोचले. यावेळी भारद्वाज यांनी ईव्हीएमवर कशा पद्धतीने फेरफार केली जाते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्यांदा झाडूला आणि मग इतर पक्षांना मतदान केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा झाडू, हत्ती, भाजप, काँग्रेसला एक-एक मत दिले. त्यामुळे सर्व पक्षांना दोन-दोन मते मिळाली. ‘मतदान केंद्रांवर काही वेळ योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे मतदान होते. त्यानंतर ज्यावेळी कार्यकर्ते मतदार म्हणून मतदान केंद्रावर जातात, तेव्हा फेरफार सुरु होते. कारण कार्यकर्ता ईव्हीएममध्ये कोड टाकतो,’ असे भारद्वाज यांनी म्हटले.ईव्हीएममध्ये कोड टाकून फेरफार केला जाऊ शकतो, असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला. यावेळी भारद्वाज यांनी काही कोडदेखील दाखवले. ‘ईव्हीएमवरील बटणांच्या मदतीने कार्यकर्ते गोपनीय कोड टाकून निघून जातात,’ असेदेखील भारद्वाज यांनी म्हटले.
दिल्ली विधानसभेतील व्हिडिओनुसार, ‘सौरभ भारद्वाज यांनी सर्व उमेदवारांच्या नावासमोरील बटण दोन-दोनवेळा दाबले. त्यानंतर कथित कार्यकर्ता मतदान करायला आल्यावर त्याने भाजपला मतदान करत कोड कार्यान्वित केला. त्यामुळे नंतर झालेल्या मतदानात आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान होऊनही भाजपचा उमेदवार विजयी झाला.’ ‘कथित कार्यकर्त्याने कोड टाकल्यावर सर्व मतदारांनी झाडूला मतदान केले. एकूण 10 जणांनी मतदान केले. मात्र जेव्हा निवडणुकीचा निकाल आल्यावर तिसऱ्या क्रमांकावरील भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात,’ असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले. यानंतर दिल्ली विधानसभेत मोठा गदारोळ झाला.
COMMENTS