80 वर्षाच्या शेतक-याचा मंत्र्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक ,वाचा धर्मा पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी !

80 वर्षाच्या शेतक-याचा मंत्र्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक ,वाचा धर्मा पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी !

मुंबई – मंत्रालयात काल एका शेतक-यानं आत्महत्येचा प्रय़त्न केला. धर्मा पाटील असं त्यांचं नाव आहे. सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी आहेत.

धर्मा पाटील यांनी का उचललं टोकाचं पाऊल ?

धर्मा पाटील यांची ५ एकर फळबाग जमीन ही औष्णिक वीज प्रकल्पासाठी २०१६ मध्ये घेतली गेलीय. यामध्ये विहीर, ७०० फूटांचा बोअर, ६०० आंब्याची झाडे आहेत. म्हणजे हे बागायती क्षेत्र आहे. तशी नोंदही ७/१२ व भूंसपादन करताना केलेल्या पंचनाम्यातही आहे. तसंच त्यांच्या शेजारच्या गटनंबरची पावणे दोन एकर जमीनही बागायती नोंद आहे. त्यांनी एजंट घातल्याने त्यांना प्रशासनाने १ कोटी ८९ लाख इतकी भरपाई दिली आहे. तर धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन बागायत असतानाही केवळ ४ लाख रूपये दिलेत.

धर्मा पाटील या अन्यायाविरोधात गेली २ वर्षे दाद मागतायत. जिल्हा प्रशासनानने दखल न घेतल्यामुळं ते मुलाला घेवून मंत्रालयात आले होते. परंतु इथंही दखल घेतली गेली नाहीय. तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन आणि दोनवेळा स्मरणपत्रे दिली होती. तरीही कुणीच दाद दिली नाही. काल रात्री घटनेनंतर रूग्णालयात धाव घेणा-या पर्यटनमंत्री आणि शिंदखेडाचे स्थानिक आमदार जयकुमार रावल यानांही ३ महिन्यापूर्वी निवेदन देवून पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्याकडूनही काहीच पाऊल उचलले गेले नाही. सर्वांकडे दाद मागूनही कुणीच प्रतिसाद देत नसल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले.

विकास, स्वच्छ कारभार याचे नुसतेच तारे तोडले जात आहेत. एकीकडं शेतक-याच्या मालाला भाव मिळत नाही. तर दुसरीकडं आयुष्याची भाकरी असलेली जमीन हिरावून घेऊनही त्याचा योग्य मोबदला दिला जात नाही. आणि त्याच्याविरोधात लढा दिला तर त्याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळचं धर्मा पाटील यांच्यासारख्या 80 वर्षांच्या वृद्ध शेतक-याला मंत्रालयाची पायरी गाठावी लागते. आणि इथेही त्यांना न्याय मिळत नाही. मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही मंत्र्यांना पाझर फुटला नाही. आता तर धर्मा पाटील यांच्यावर योग्य उपाचार करुन त्यांना वाचवणे गरजेचे आहे. तसंच यातील दोषी अधिका-यांवर कठोरातील कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.

COMMENTS