शेतक-यांच्या कर्जमाफीत घोळ, आमदारालाच दिली कर्जमाफी ?

शेतक-यांच्या कर्जमाफीत घोळ, आमदारालाच दिली कर्जमाफी ?

नागपूर – शेतक-यांच्या कर्जमाफीचा घोळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ऑनलाई अर्ज भरण्यामध्ये घोळ आढळून आला होता. परंतु आता कर्जमाफीची रक्कम चक्क एका आमदाराच्या खात्यावर जमा झाली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीचा अर्ज न करताही २५ हजारांची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांना ही कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. खुद्द आमदार आबीटकर यांनीच या कर्जमाफीच्या घोळाचा पर्दाफाश केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी आपल्या बँक खात्यावर कर्जमाफीचे २५ हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती स्वतः विधीमंडळात दिली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले ‘मी कर्जमाफीसाठी अर्ज केलाच नव्हता, मात्र तरीदेखील माझे नाव लाभार्थ्यांच्या यादीत होते. यात भर म्हणजे कर्जमाफीचे २५ हजार रुपये माझ्या बँक खात्यात जमा देखील झाले’. तसेच बँका अपात्र लोकांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करत असतील तर हा एक मोठा घोटाळा देखील असू शकतो. याशिवाय शिक्षक आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली, असा आरोप करत त्यांनी काही अधिका-यांची नावे देखील जाहीर केली.

आबीटकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सरकारने दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून याबाबत सहकार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. कर्जमाफीच्या या घोळावरुन ख-या कर्जबाजारी शेतक-याला कर्जमाफी मिळणार का असा प्रश्न आता सामान्य शेतक-यांना पडत आहे.

COMMENTS