मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक फटका बुलढाणा, अमरावती व जालना जिल्ह्याला बसला असल्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश काल कृषीमंत्र्यांनी दिले होते. काल या बाधित जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन व कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित 11 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यातील 42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील 175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. जालना व परभणी जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 2 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहु, कांदा व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहु, कांदा, फळ व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा या आठ तालुक्यातील 270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील 101 गावांमधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.
COMMENTS