गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – कृषिमंत्री

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – कृषिमंत्री

मुंबई – राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तसेच धुळे याभागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत.

राज्यातील ज्याभागात आज अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला आहे. त्यांनी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली आहे.ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी उद्या संबंधीत विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील ही माहिती इमेलद्वारे देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देता येईल असंही फुंडकर यांनी म्हटलं आहे.  स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत .

COMMENTS