मुंबई – भाजपची आज महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला राज्यातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेबाबत खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. तसेच लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत केली तसेच सर्वांची भावना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. ‘आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,’तसेच पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आज भाजपनं आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा एकदा शिवसेना -भाजप युतीत ठणगी पडली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS