गोवा विधानसभा अधिवेशनाची तारीख ठरली, फक्त चारच दिवस चालणार कामकाज

गोवा विधानसभा अधिवेशनाची तारीख ठरली, फक्त चारच दिवस चालणार कामकाज

पणजी – गोवा विधानसभा अधिवेशनाची तारीख ठरली असून 13 डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरु होत आहे. यावर्षीच्या अधिवेशनाचं कामकाज फक्त चारच दिवस चालणार आहे. या चार दिवसात 703 प्रश्न मांडण्यात येणार आहेत. याबाबात मंगळवारी राज्य विधिमंडळ कामकाज समितीनं बैठक घेतली. या बैठकीत अधिवेशनाची रुपरेषा आखण्यात आली. त्यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांसह आदी नेते उपस्थित होते.

4 विधेयके आणि 4 खासगी ठराव मांडणार

या अधिवेशनात 703 प्रश्न सादर केले जाणार असून त्यात 242 तारांकित व 461 अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. चार सरकारी विधेयके व चार खासगी ठराव अधिवेशनात मांडले जाणार आहेत. दरम्यान, नगर नियोजन कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यासाठी येत्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. गोमंतकीयांनी जर 250 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधले तर त्या घराच्या कामासाठी साधनसुविधा कर आकारला जाणार नसल्याचं मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे.तसेच नगर नियोजन कायद्याच्या कलम 49(6)नुसार सध्या कुणालाही पीडीएच्या क्षेत्रत येणा-या गावातील आपला भूखंड विकायचा असेल तर पीडीएची एनओसी गरजेची ठरते. याचप्रमाणे नव्या दुरुस्तीनुसार यापुढे पीडीए क्षेत्राखाली न येणा-या गावातील लोकांना देखील नगर नियोजन खात्याची एनओसी घ्यावी लागणार आहे.

या कलमांमध्ये होणार दुरुस्ती

या अधिवेशनात कलम 16(अ) आणि 17(अ) हे देखील दुरुस्त केले जाणार आहे. सध्या या कलमांचा भंग करणा-यांना 1 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे. दंडाचे हे प्रमाण 10 लाख रुपये केले जाईल व त्याशिवाय दोषी व्यक्तीला एक वर्ष कैद भोगावी लागणार आहे.

COMMENTS