पुणे: आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगावअसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. राआधीची स्मारक समिती सूडबुद्धीने बरखास्त करण्यात आली आहे. या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे, अशी टीका करतानाच अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला रोहित पवारांना पोस्टर बॉय बनवायचे आहे का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ये पब्लिक है, सब जानती है, या शिर्षकाखाली एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून पडळकरांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे. सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं, अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे.
वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी १.५ कोटी विद्यापीठ व १.५ कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठाने १ कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली. पण हे सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे ‘पई पाव्हण्यांचं सरकार’ याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय, असा दावाही त्यांनी केला आहे.
COMMENTS