शिवसेनेचा गुजरातमध्ये ‘नांदेड फॉर्म्युला’ !

शिवसेनेचा गुजरातमध्ये ‘नांदेड फॉर्म्युला’ !

अहमदाबाद – गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना अपशकून नको म्हणून गुजरात विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेनेनं आपला जुना निर्णय बदलून आता अचानकपणे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मग असं काय झालं की शिवसेनेनं आपला पूर्वीचा निर्णय बदलून गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रुंगू लागली आहे.

राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असले तरी भाजप आणि शिवसेनेतले संबंध अत्यंत विकोपाला गेले आहे. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून ते एकत्र आहेत. मात्र जिथे संधी मिळेल तिथे दोन्ही पक्ष एकमेकांना संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. नांदेडमध्ये भाजपने शिवसेनेचा आमदार फोडून भाजपच्या गळाला लावला आणि त्याच्याकडे नांदेड महापालिकेची सूत्रं दिली. ( प्रताप पाटील चिखलीकर हे केवळ तांत्रिकदृष्टया शिवसेनेत आहेत.) त्यामुळे मग शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला. आणि नंतर जे व्हायचं तेच झालं. भाजपचा दारुण पराभव झाला. भले शिवसेनेचाही झाला. परंतु भाजपचा पराभव झाला म्हणून शिवसेचे नेते आंनंदी झालेत असं वक्तव्य निकाला नंतर मुख्यमंत्र्यांनी  केलं होतं.

नांदेडचा कित्ता गिरवण्याचा प्रय़त्न शिवसेना गुजरातमध्ये करण्याच्या तयारीत आहे. गुजरातमध्ये सध्या जातीच्या नावावर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. गुजरातमधील तीन मासबेस तरुण नेत्यांनी त्यांच्या जातीचे मजबूत संघटन केले आहे. त्यापैकी ओबीसींचा नेता असणारे अल्पेश ठाकूर हे काँग्रेसमध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण पाठिंबा काँग्रेसला आहे. गुजरातमधील दलित समाज साधारणपणे काँग्रेससोबत आहे. त्यातच दलितांचं नेतृत्व करणारे जिग्नेश मेवानी यांनीही काँग्रेसला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहता राहिला प्रश्न पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचा. त्यांनाही कोणत्याही स्थितीत भाजपला पराभूत करायचं आहे. पाटिदारांचीही तीच मानसिकत आहे. मात्र त्यामधील अनेक पाटीदार हे हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेसशी जुळवून घेणं अवघड जातंय. अशांपैकी मग काहीजण नाराज असूनही भाजपकडे जाऊ शकतात. तसंच इतर समाजातील कडवे हिंदुत्ववादी ज्यांना भाजप नको आहे, मात्र काँग्रेस मान्य नाही अशा हिंदुत्ववादी मतदारांसाठी एक वेगळा पर्याय असावा म्हणून शिवसेना गुजरातच्या रिंगणात उतरत असल्याचा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याच्यामध्ये किती यश येईल हे आता सांगणं कठिण आहे. मात्र काही प्रमाणात का होईना हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल असाही अंदाज व्यक्त केला जातोय.

COMMENTS