गुरुदास कामतांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमधील कामत गटाचे भवितव्य ?

गुरुदास कामतांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमधील कामत गटाचे भवितव्य ?

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या यांच्या निधनामुळे मंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत काँग्रेसमध्ये जे गटतट आहेत. त्यामध्ये सर्वात प्रबळ आणि प्रभावी गट म्हणून कामत गटाची गणना केली जाते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं संजय निरुपम यांच्याकडे गेल्यापासून गुरुदास कामत नाराज होते. त्यामुळे ते पक्षाच्या कामकात फारसे सक्रीय दिसत नव्हते. मल्लीकार्जुन खरगे यांची राज्याच्या काँग्रेसच्या प्रभारीपदी निवड झाल्यानंतर खरगे मुंबईत आले होते. त्यावेळी कामत कार्यक्रमात हजर होते. पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसमध्ये ते सक्रिय होण्याची चिन्ह होती. त्यापूर्वीच त्यांची चटका लावणारी एक्झीट झाली आहे. त्यांच्या निधनामुळे मुंबई काँग्रेसला निश्चितपणे फटका बसणार आहे.

मुंबई काँग्रेस कायम गटातटाच्या राजकारणाने ग्रासला आहे. मागील अनेक वर्ष मुंबई काँग्रेसमध्ये मुरली देवरा आणि गुरुदास कामत असे दोन गट सक्रीय होते. तर आता त्यात संजय निरुपम गटाची भर पडली आहे. गुरुदास काम स्वभावाने वरून शांत वाटत असले तरी आतून ते बंडखोर होते. त्यामुळेच पक्षात मनाविरुद्ध झाले की ते पक्षातील नेत्यांविरोधातच संघर्ष करायला मागेपुढे पहायचे नाहीत. त्यातूनच त्यांनी दोनदा राजीनामास्त्रही उगारलं.

कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना 2004 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं. तर 2007 साली मुंबई महापालिका जिंकण्याचा त्यांचा निर्धार होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. मुरली देवरा, कृपाशंकर सिंग, संजय निरुपम या मुंबई काँग्रेसच्या आजी-माजी अध्यक्षांबरोबर त्यांचा नेहमीच वाद व्हायचा. मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांना मानणारा मोठा गट आहे. कामत राजकारणापासून काहीसे अलिप्त झाल्यानंतर कामत गटातील नेतेही शांत होते. राजहंस सिंह, समीर देसाई यांच्यासह काही नेत्यांनी भाजपाचा रस्ता धरला तर कामत गटाचे देवेंद्र आंबेरकर यांच्यासह  काही नगरसेवक शिवसेनेत गेले. तर चंद्रकांत हंडोरे यांच्यासारखे नेते स्वयंभू नेते झाले आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहतील अशी शक्यता आहे.

2019 ची लोकसभा निवडणूक उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढवण्याची कामत यांची तयारी होती. कामत पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असते तर काँग्रेसपासून दूर गेलेले त्यांचे समर्थक परत आले असते. आता मात्र कामत यांच्या निधनाने ती शक्यता मावळली असून त्याचा प्रत्यक्ष फटका आगामी निवडणुकीत काँग्रेसला बसणार आहे. कामत विद्यार्थी असताना काँग्रेसप्रणीत एनएसयूआयमध्ये काम करत होते. त्यानंतर युवक काँग्रेस, पुढे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस, कार्यकारी समितीचे सदस्य अशा अनेक महत्त्वपूर्ण पदावर काम केलेल्या कामतांकडे संघटनकौशल्य होते.

मुंबईत काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मुंबईत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई काँग्रेसमध्ये असून कामत यांच्या निधानाने हा वर्ग काँग्रेसपासून दूर जाण्याची भीती असून त्याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागण्याची शक्यता आहे.

COMMENTS