हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार?

हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार?

नवी दिल्ली – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचं आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे. २०१५ मधील मेहसाणा येथील हिंसाचाराप्रकरणी झालेल्या शिक्षेस स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला आहे. हायकोर्टाने शिक्षेस स्थगिती देण्यास नकार दिल्याने हार्दिक पटेल यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.  लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीस निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे पटेल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत.

हार्दिक पटेल यांच्याकडून मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये २३ जुलै २०१५ रोजी भाजपा आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. पाटीदार आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात हा प्रकार घडला होता. या हिंसाचाराप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांच्या वतीने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असल्यामुळे हार्दिक पटेल यांना धक्का बसला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अहमदाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे त्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगणार, असे दिसत आहे.

COMMENTS