(स्थळ : तेच आपलं नेहमीचं… ‘वर्षा निवास’…. वेळ : संध्याकाळी ‘दिवे’ लागणीची… वातावरणात निरव शांतता पसरलेली…. ‘कमळी’ तुळशी व्रूंदावनासमोर बसून ‘१२३’ मण्यांची माळ जपण्यात अगदी तल्लीन होत ‘ध्यानस्थ’ बसलेली असते… तितक्यात ‘शिवसेन’ काहीशा चोरपावलांनी आत येतो….)
‘शिवसेन’ : (स्वत:शीच) अरे, इतक्यात हे काय होतंय हे समजतच नाही. ‘ही’ कधी सिनेमाची गाणी ऐकतेय, तर कधी ‘भक्ती’गीतं. मात्र, आज चक्क तुळशीसमोर ‘माळ’ जपतीये. कमळीला इतक्यात चांगलेच देव आठवायला लागले वाटतं…. असू दे… सुधरती आहे…
(तितक्यात कमळीची समाधी भंग पावते)..
‘कमळी’ : बाई गं, ‘माळ’ जपतांना कधी ‘वेळ’ गेला समजलंच नाही. चला बाई आता ‘आरती’ करून घेते…
(कमळी अंगणातील तुळशीपासून उठत घरातल्या देवघरात येते. दिवा-उदबत्ती लावत ‘कमळी’ची आरती सुरू होते….)
‘जय देव जय देव
जय ‘शिवसेन नाथा’
प्रसन्न होशी लवकरी
‘मुका’ दे आता….
जय देव जय देव
जय ‘शिवसेन नाथा’…
घर फिरले आता
वासेही फिरले
नरेंद्र अन देवेंद्र प्रेमानं
मन माझे भरले…
नको आता भांडण-गोंधळ
नको रे ‘सामना’
शिवसेन आता फक्त
‘मुक्या’चीच ‘कामना’….
विसरून जाऊ आता जुन्या ‘बाता’
परत बहरू दे अपुल्या प्रेमाची ‘गाथा’
जय देव जय देव
जय ‘शिवसेन नाथा’…
(‘कमळी’च्या ‘आरती’तून आलेल्या ‘प्रेमा’च्या भरतीनं ‘शिवसेन’ही अवाक होवून जातो…. तितक्यात तिला ‘शिवसेन’ आल्याचं तिच्या लक्षात येतं…)
‘कमळी’ : अगं बाई!, तुम्ही कधी आलात. माहितही नाही पडलं मला… मी पण ना बाई आपल्याच ‘घोरा’त… जप, आरती…. या बसा ना माझ्याजवळ…
‘शिवसेन’ : (काहीशा हेटाळणीच्या सुरात)… नको, मी उभाच बरी…. का गं, अलीकडे चांगलाच ‘देव-धर्म’ सुरू दिसतोय तुझा….
‘कमळी’ : (काहीशा ‘लाडीक’ सुरात..) दुसर्या कुणासाठी करणार तुमच्याशिवाय…. तुमच्यासाठीच करते हो हे सारं… तुम्हाला देवानं ‘सदबुद्धी’ द्यावी, माझ्याबद्दल ‘प्रेम’ वाटावं यासाठीच करती आहे सारं…
‘शिवसेन’ : (रागाच्या सुरात) ‘कमळे’!, आता माळाऐवजी मागच्या साडेतीन वर्षांत तु मला ‘जपलं’ असतं तर ही वेळच आली नसती तुझ्यावर…. नरूदादा, अमितमामाच्या सल्ल्यानं वागलीस आता भोग फळं त्याची…. अन हो, ज्या ‘बारामतीकर’ काकांच्या भरवशावर तू उड्या मारायचीस ते कुठे आहेत आता… तुझ्याचविरोधात ‘मोट’ बांधतायेत ना ते आता…
(आता मात्र ‘कमळी’चा पारा चढलेला असतो काहीसा…. ‘माहेर’च्या लाडक्या सुधीरभाऊशी बोलायला ‘शिवसेन’नं नकार दिल्यानं तिचा पारा चढलेला असतो….)
‘कमळी’ : का हो, तुम्हाला झालं तरी काय?… काय समजता तुम्ही स्वत:ला…. होतात चुका… मी आता ‘बदलली’ तरी तुमची भाषा मात्र ‘बदल्या’चीच… आता माझा माहेरची माणसं तुमच्या ‘मातोश्री’वरही यायला चालत नाही. अमितमामांचा ‘प्रेमा’चा निरोप घेवून सुधीरभाऊ येणार होते. तुम्ही तर सरळ सध्याच ‘प्रेमा’च्या गोष्टीसाठी ‘मुड’ नसल्याचं म्हटलं.
(‘कमळी’चा वाढलेला आवाज ऐकून आतल्या खोलीत बसलेले सुधीरभाऊ दिवानखान्यात येतात…)
सुधीरभाऊ : (काहीशा समजूतीच्या स्वरात…) तू कायले एवड्या जोरानं बोलून र्हायली वं कमळाताई दाजींशी…. तपते माणुस कवा-कवा… समजून घेत जायनं तू… जवाई माणसाच्या मांगं किती बी ‘वन-वन’ फिरलं तरी काई होत नाई वं…. तूले तं म्हणलं भावजीले घीऊन ये एकदा ताडोबाले फिराले….. एका ‘वाघा’ची दुसर्या ‘वाघां’सोबत भेट झाली असती ना. पण तूच मागच्या साडेतीन वर्षांत ‘वर्षा’च्या व्यापानं अन अतिप्रेमानं त्याइले दुखवलं असशीन… म्हणून तर हे सारे ‘अनर्थ’ होत आहेत वं ताई….
‘कमळी’ : (सुधीरभाऊंना खास विदर्भी ठसक्यात)…. का बे, तु माह्या माहेरचा हाय का त्यायच्या रे…. माह्या सासरच्या संजूभावजीकडून शिक थोडं… निरा मले टोमणे मारत र्हायतात ना राज्या ‘सामना’तून… मले तुह्या जवायाच्या अन संजूभावजीच्या टोमण्यायचाच ‘सामना’ करत र्हा लागते रे….बरं, तु थोडा आत जाय नं… मले यायच्याशी थोडं ‘पर्सनल’ बोल्याचं हाय…
(सुधीरभाऊ आत जातात… आता दिवाणखान्यात ‘कमळी’ अन ‘शिवसेन’असतो…)
‘कमळी’ : (लडिवाळपणे) अहो, ऐका ना… एकदा मुका घ्या ना….
‘शिवसेन’ : (काहीशा तटस्थपणे) नको, काही गरज नाही… मी नाही घेत उष्ट्या तोंडाचा ‘मुका’… सत्तेचं सौंदर्य खुलावं म्हणून कुणा-कुणाचे मुके घेतले नाहीस तू…. आता सर्वांनी पाठ फिरवल्यानं मी आठवलो का गं तुला.
‘कमळी’ : अहो जाऊ द्या हो ते सारं… एकदा ‘मौका’ द्या ना ‘मुक्या’चा…. तुम्ही ‘मुका’ दिला तर आपल्या ‘संसारा’ची ‘युती’ परत एकदा भक्कम होईल… २०१९ पर्यंत आपण एक बाळ जन्माला घालू… मुलगा झाला तर ‘विकास’ अन मुलगी झाली तर ‘प्रगती’ नाव ठेवू तिचं….
‘शिवसेन’ : ऐक कमळे, तु आता कितीही ‘मुके’ घ्यायचा प्रयत्न कर. मी बधणार नाही. तुझ्या मुक्याची कास धरून मी परत अधोगतीचा ‘फास’ नाही लावून घेणार गळ्याशी….. मी माझीच गती वाढवत आता ‘स्वबळा’चे पंख लावणार आहे कमळे…. अगं, याच ‘वर्षा’वर तू माझे अपमान केलेत ना अनेकदा… तिथं मी भविष्यात स्वत:चंच तोरण लावण्याचं स्वप्न पाहिलं आहे कमळे…. त्यामूळे तुझा ‘मुका नाही म्हणजे नाहीच…. मला ‘मुका नको आता ‘मौका’ हवा आहे, कमळे…. निघतो मी…..
‘कमळी’ : (हताशपणे) अहो, ऐकाना…. थांबाना… एकदा तरी… घ्या ना…. मुका… अहो….. सुधीरभाऊ त्यांना थांबवा ना…. त्यांना थांबवा ना प्लीज…. ‘मुका’… ‘मुका’….
(सुधीरभाऊ येईपर्यंत शिवसेन ‘मातोश्री’च्या दिशेनं निघत दिसेनासाही झालेला असतो…)
@ उमेश अलोणे,
अकोला.
(सर्व हक्क राखीव)….
COMMENTS