अहमदनगर: ग्रामीण राजकारणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात एकदा स्वत:ला ‘टग्या’ संबोधले होते. त्यांचे पुतणे कर्जत-जामखेडचे आमदार यांनी आता वेगळ्या अर्थाने स्वत:ला ‘सामाजिक गुंड’ म्हणविले आहे. याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पवारांना टोला लगावला आहे. मतदारसंघात मागील दीड वर्षांत जे काही घडत आहे, त्यावरून ‘ते सामाजिक गुंड आहेत की गुंड हे लोकांनीच ठरवावे,’ टोला शिंदे यांनी लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील खर्डा येथे प्रचाराचा प्रारंभ करताना पवार यांनी शिंदे यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, ‘निवडणुका बिनविरोध करण्याचा माझा मूळ विचार विरोधकांना पटलाच नाही. गावात गटबाजी नको, लोकांनी एकत्र येऊन विकासाला चालना द्यावी, असा माझा विचार होता. मात्र, ज्यांचे राजकारण गटबाजी करून पोळी भाजण्याचे आहे, त्यांना हे समजणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात सामान्यांचा आवाज दडपून टाकून निवडणुका घेण्याची पद्धत पडली आहे. आता हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ‘सामाजिक गुंड’ कोणी नाही, असा इशारा दिला.
त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, ‘हा मतदासंघ गेल्या २५ ते ३० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत भुलभुलय्या केला गेला. आता लोक त्याला बळी पडणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मागील एक दीड वर्षात या मतदारसंघात जे काही सुरू आहे, त्यावरून ते ‘समाज गुंड’ आहेत की ‘गुंड’ हे लोकांच्या चांगलेच लक्षात आले आहे.
COMMENTS