अपक्ष आमदाराला काॅंग्रेस अन भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची ऑफर

अपक्ष आमदाराला काॅंग्रेस अन भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची ऑफर

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच ठरलयं म्हणत काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने राजीनामा देऊन अपक्ष निवडणुक लढवली. त्या अपक्ष उमेदवाराने विजय मिळला. त्या आमदाराने आपल्या पक्षात प्रवेश करावा, यासाठी काॅंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ऑफर दिली आहे. त्यामुळे हे काॅंग्रेसचे आमदार कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिली आहे.

काॅंग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे एका लग्नासाठी इचलकरंजीत आले होते. त्याचवेळी आवाडे यांनी त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार पाटील यांनी आवाडेंच्या घरी भेट दिली. यावेळी दोघांत बराचवेळ चर्चा झाली. यानंतर पत्रकारांनी पाटील यांना विचारले असता ‘काँग्रेस का घर उनका है, वो कभीभी वापस आ सकते है’ असे म्हणत काँग्रेसने निमंत्रण दिल्याची कबुलीच पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे आवाडे यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि आमदार पी. एन. पाटील हेदेखील उपस्थित होते. ‘या भेटीने आमचे पन्नास टक्के काम झाले’ असे उद्गार पालकमंत्री पाटील यांनी काढले.

दरम्यान, आमदार आवाडे यांना भाजपमध्ये घेण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी त्यांना जिल्हाध्यक्षपदाची ऑफर दिली गेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून आल्याने आणि जिल्ह्यात एकही भाजपचा आमदार नसल्याने आवाडेंना पक्षात घेऊन ताकद वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार आवाडे यांनी काँग्रेसला रामराम केला. तेव्हा ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. विधानसभेला ते अपक्ष म्हणून निवडून आले. पण राज्यात भाजपची सत्ता येणार म्हणून त्यांनी त्या पक्षाला पाठिंबा दिला. पण,अचानक राजकीय समीकरणे बदलली आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यातूनच आमदार आवाडे यांना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेले पन्नास वर्षे माजी मंत्री कल्लाप्पणा आवाडे व कुटुंबीय काँग्रेससोबत आहे. ही पार्श्वभूमीही या प्रयत्नांच्या मुळाशी आहे.  त्यामुळे आवाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होणार की भाजपचे, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

COMMENTS