नागपूर – गोसीखुर्द प्रकल्पांमधील विविध कामांच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी चार कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक कंपनी एका भाजप आमदाराची असल्याचीही माहिती मिळत आहे. लाचलूचपत विभागाने भाजपचे विद्यमान आमदार मितेश भांगडिया, भाजप मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीचे आमदार रामाराव रेड्डी यांच्या कंपनीचाही यात समावेश आहे. त्यामुळे मितेश भांगडिया आणि रामाराव रेड्डी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मोखाबर्डी उपसासिंचन योजनेतील नवतळा, मेटेपार, चिखलापार, शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाच्या कामाकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर निविदेचे मूल्य वाढवण्यात आले, परंतु जुन्या निविदेनुसारच व त्याच अर्हतेनुसार अपात्र ठरणाऱ्या मेसर्स एम.जी. भांगडिया या कंपनीला कंत्राट देण्यात आले. यावरून अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमत करून कंत्राट मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गोसीखुर्द डावा कालवा मातीकाम व बांधकामाच्या निविदेचेही मूल्य वाढवण्याच्या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंते आणि मेसर्स श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी, आमदार रामाराव रेड्डी, श्रीनिवासुला रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
COMMENTS