जालना जिल्ह्यातील आष्टी येथे साकारणार सामूहिक कृषी प्रक्रिया उद्योग प्रकल्प

जालना जिल्ह्यातील आष्टी येथे साकारणार सामूहिक कृषी प्रक्रिया उद्योग प्रकल्प

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीगटाची म्हैसूर येथील प्रकल्पास भेट  

मुंबई – जालना जिल्ह्यातील आष्टी गाव समुहामध्ये केंद्र शासनाच्या रुरबन प्रकल्पाअंतर्गत कृषी माल उद्योग प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला चालना मिळावी, यासाठी राज्यातील मंत्रीगटाने आज म्हैसूर येथील एमएफजी इंडस्ट्रिलच्या सायकल अगरबत्ती प्रकल्पाला व केंद्रीय अन्न तंत्रज्ञान व संशोधन संस्थेला भेट देऊन तेथील प्रकल्पांची पाहणी केली, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.  

कृषी माल प्रक्रिया उद्योगांची पाहणी करण्यासाठी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार या मंत्रीगटाच्या शिष्टमंडळाने कर्नाटकमधील म्हैसूर केंद्रीय अन्न तंत्रज्ञान व संशोधन संस्थेतील सायकल अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी केली.

जालना जिल्ह्यातील आष्टी गाव समूहाअंतर्गत रुरबन प्रकल्पाला केंद्र शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हास्तरीय शिखर समितीची नुकतीच बैठक झाली असून त्यात जालनाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. या गाव समुहातील कृषी माल प्रक्रिया उद्योग समूह प्रकल्पाची आखणी करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही लोणीकर यांनी या बैठकीत दिल्या.

या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग समूह स्थापन करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ आणि पंचायत समिती, परतूर यांची संयुक्त जबाबदारी हा प्रकल्प राबविण्यसाठी असणार आहे. आष्टी गाव समुहाअंतर्गत मौजे पांडे पोखरी येथे दहा एकर जमिन या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी आराखडा तयार करणे, कौशल्य विकास प्रशिक्षण याबाबतची जबाबदारी महाराष्ट्र उद्योजकता महामंडळाकडे देण्यात आली आहे. यामध्ये टोमॅटो प्रक्रिया, सोयाबिन प्रक्रिया, धान्य स्वच्छता, कापूस वेचणी, मक्यावरील प्रक्रिया, गव्हाच्या पिठापासून मैदा तयार करणे, मिरची पावडर मसाले तयार करण्याचा प्रकल्प, पापड, बेसन, चिप्स बनविण्याचा प्रकल्प, गांडूळ खत तयार करणे, अद्रक पावडर तयार करणे अशा एकूण 59 प्रकल्पांचा समावेश आहे.

मानव विकास मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यातील भोकरदन व परतूर या तालुक्याचा समावेश असून दोन्ही तालुक्यात मानव विकासाचा निर्देशांक उंचविण्यासाठी या भेटीचा निश्चित फायदा होणार आहे, असे लोणीकर यांनी सांगितले आहे.

 

 

COMMENTS