नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १७ एप्रिल रोजी मेहबुबा मुफ्ती सरकारने आपल्या सर्व ९ मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. परंतु, पक्षाने त्यांचे राजीनामे राज्यपालांकडे पाठवले नव्हते. दोन वर्ष जुन्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कठुआ प्रकरणी भाजपाचे मंत्री लाल सिंह आणि चंद्रप्रकाश गंगा यांनी या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनात रॅलीत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता.
दरम्यान निर्मल सिंह यांच्या जागी कविंदर गुप्ता हे आता उपमुख्यमंत्री होणार आहेत. गुप्ता सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तसेच आज मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. या फेरबदलात भाजपाकडून काही नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता असून राज्यपाल एन.एन.व्होरा आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा राजभवन ऐवजी कन्वेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.
COMMENTS