मुंबई – धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल भूमाफिया असून रावल यांची शेकडो एकर जमीन कुत्रे आणि मांजरांच्या नावावर असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच रावल यांचे दलाल आमच्याकडे फिरत होते असे धर्मा पाटील कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. 22 तारखेला बावनकुळे यांच्याकडे बैठक होती ती रद्द केली, मोबदला मिळत नाही म्हणून त्यांनी विष प्यायले असून रावल परिवार, मंत्री, त्यांचे वडील, बहीण यांच्या नावे जमीन लाटण्याचा उद्योग सुरू आहेत आसा आरोपही मलिक यांनी केला आहे. 1976 साली कमाल जमीन धारणा कायदा आल्यानंतर 52 एकरपेक्षा जास्त जमीन कोणतंही कुटुंब ठेवू शकत नाही, मात्र रावल कुटुंबियांच्या नावे 800 एकर जमीन असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी केलेल्या या आरोपामुळे जयकुमार रावल यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान रावल कुटुंबियांची जमिनीची भूक संपत नसून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घ्यायच्या आणि करोडो रुपयांना विकायच्या हा रावल यांचा धंदा असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच 2009 साली नोटिफिकेशन निघाल्यावर जमीन खरेदी-विक्री बंद असतानाही रावल यांनी जमीन कशी खरेदी केली असा सवालही मलिक यांनी केला आहे. रावल यांनी हे सगळे बेकायदेशीरपणे व्यवहार केले असून शेतकऱ्यांकडून 2 लाख रुपयात जमीन खरेदी करुन 2 करोड सरकारकडून मोबदला घेतला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.
जयकुमार रावल यांनी स्वतःच्या नावाने जमीन खरेदी केली, दुसरी जमीन जे. के मेडिकल सर्व्हिस नावाने खरेदी केली असून नोटिफिकेशन काढल्यावर कोणतीही जमीन खरेदी-विक्री करता येत नाही. तसेच एमआयडीसीसाठी संपादीत जमीन खरेदी प्रकरणी खडसेंची हकालपट्टी झाली, मग ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित झालेली जमीन घेतली तर रावल यांची हकालपट्टी करून त्यांची चौकशी करणार का असा सवालही मलिक यांनी केला आहे.
COMMENTS