ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार ?

ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार ?

भोपाळ – मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे याच्यासोबत गेलेले त्यांचे जवळचे सहकारी आणि सेवादलाचे माजी राज्य प्रमुख सतेंद्र यादव यांनी काल पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलतना त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा केला आहे. तसचं तशी चर्चा मध्यप्रदेशात सुरू आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस आणि तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर नाराज होते. त्यातून त्यांनी त्यांच्या समर्थक 22 आमदारांसह दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपद देऊ असं आश्वासन भाजपनं दिल्याचं बोललं जातंय. मात्र ते अजून पूर्ण झालं नाही. त्यातच 22 पैकी 10 आमदारांना मंत्रिपद देण्याचं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलीची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. तसचं ते शिंद समर्थकांना 6 पेक्षा जास्त मंत्रिपदं देण्यास इच्छुक नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिंदे यांचे समर्थक नाराज असल्याचं बोललं जातंय.

भाजपचे ज्येष्ठ नेते बालेंदू शुक्ला यांनीही भाजपला रामराम करत काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शुक्ला हे माधवराव शिंदे यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. मात्र शिंदे यांच्या विमान अपघातातील निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी त्यांचं सूत फारसं जुळलं नाही. त्यातूनच त्यांनी 2009 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. शुक्ला यांचा चंबळ आणि परिसरात मोठा दबदबा आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानल्याचं बोललं जातंय.

पुढच्या काही दिवसात शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 22 आमदारांच्या राजीनाम्यामुळे तिथे पोटनिवडणुका होणार आहेत. तिथे शिंदे समर्थक माजी आमदार आणि भाजपचे इच्छुक यांच्यात तिकीटवाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकाला तिकीट दिले तर दुसरा नाराज होणार आहे. त्यातूनच नाराज गट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारवर अस्थिरतेचे ढग जमा होऊ लागले आहेत.

COMMENTS