कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर !

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 15 मे रोजी या निवडणुकीचे निकाल लागणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे. ४ कोटी ९६ लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा हे मैदानात आहेत.

सध्या कोणत्या पक्षाच्या किती जागा?

काँग्रेस – 122

भाजप – 43

जेडीएस – 34

बीएसआरसी – 3

केजेपी – 2

केएमपी – 1

अपक्ष – 8

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा मुद्दा चर्चेत असून कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच लिंगायत कार्ड खेळत लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, ज्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. याशिवाय कर्नाटकात मुस्लीम आणि वोक्कालिगा समाजाचीही निर्णायक भूमिका असणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. कारण, काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांना लोकसभा निवडणुकीअगोदर या निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.

COMMENTS