कर्नाटक निकालाने काँग्रेस, भाजप, जेडीएस जमिनीवर, वाचा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीसह सविस्तर विश्लेषण !

कर्नाटक निकालाने काँग्रेस, भाजप, जेडीएस जमिनीवर, वाचा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीसह सविस्तर विश्लेषण !

कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालाबाबत सर्वज राजकीय पक्ष आपआपल्या परिने निवडणुकीचं विश्लेषण करून त्याचा आपल्या सोईनुसार अर्थ लावत आहेत. मात्र या निकालाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास सर्वच राजकीय पक्षांना या निकालाने जमीनवर आणले आहे असेच म्हणता येईल. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार तरी तसाच त्याचा अर्थ निघतोय.

काँग्रेसचा विचार करता त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. गेल्यावेळी 122 जागा जिंकणा-या काँग्रेसला यावेळी मात्र केवळ 78 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळे काँग्रेसला काही जागा गमवाव्या लागल्या होत्या. कर्नाटकात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार उभे केले नव्हते. दुसरी महत्वाची बाब म्हणज्ये मुस्लिम, एससी, एसटी, कुरबा यासारखी व्होट बँक असताना काँग्रेसला सत्ता टिकवता आली नाही. गेल्या पाच वर्षात इंदिरा कॅन्टीन यासारख्या काही योजनांनी मतदारांना आकर्षित कऱण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. निवडणुकीच्या आधी काही दिवस लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णयही काँग्रेस सरकारने घेतला. मात्र त्याचा काहीच फायदा काग्रेसला झाला नाही. उलट तो निर्णय पक्षाच्या अंगलट आला असंच म्हणावं लागेल.

काँग्रेसला दिलासादायक बाब म्हणज्ये मतांच्या टक्केवारीत गेल्यावेळच्या तुलनेत वाढ झाली आहे. 2013 मध्ये काग्रेसला 36.59 टक्के मते होती. यावेळी त्यामध्ये जवळपास दीड टक्क्यांची वाढ झाली आहे. यावेळी काँग्रेसला 38 टक्के मते मिळाली आहे. मात्र गेल्यावेळी विरोधकांची मते विभागली गेल्यामुळे काँग्रेसला जागांचा मोठा फायदा झाला होता. यावेळी मात्र भाजपची मते मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने काँग्रेसला फटका बसला. त्याचबरोबर जेडीएस आणि भाजपने काही ठिकाणी केलेली अतंर्गत युती याचाही फटका काँग्रेसला बसला. मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामंडेश्वरी या मतदारसंघात पराभव झाला. या ठिकाणी भाजपने डमी उमेदवार देऊन जेडीएसला मदत केली. त्यामुळे जेडीएच्या उमेदवाराला 1 लाख 21 हजारापेक्षा जास्त मते मिळाली. काँग्रेसला 85 हजार तर भाजपच्या उमेदवाराला केवळ 12 हजार मते मिळाली. जेडीएस आणि भाजप यांच्यात काही मतदारसंघात अशी अंडरस्टंडीग होती. त्याचा फटकाही काँग्रेसला बसला.

भाजपच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली असली तरी अपेक्षीत यश पक्षाला मिळालं नाही. पंतप्रधानांसह केंद्रातील अनेक मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचंड जोर लावूनही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. गेल्यावेळी भाजपला केवळ 40 जागा होत्या. त्यामध्ये तब्बल 64 जागांची भर पडून पक्षाने शंभरी पार केली. 104 जागा मिळाल्या. मात्र बहुमतापासून पक्ष 6 जागा मागे राहिला. मतांच्या टक्क्यामध्ये भाजपने मोठी झेप घेतली. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फक्त 19.89 टक्के मते होती. ती यावेळी 36.20 टक्क्यांवर गेली आहेत. भाजपला स्वबळावर कर्नाटकात सत्ता येईल असा विश्वास होता. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी तर स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची तारीखही जाहीर करुन टाकली होती. मात्र ते शेवटी बहुमतापासून दूर राहिलेच.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली असली तरी ती मते काँग्रेसच्या मतांपेक्षा कमीच आहेत. काँग्रेसची मते भाजपपेक्षा जवळपास 2 टक्के जास्त आहेत. त्याचबरोबर 2013 मध्ये येडीयुरप्पा यांच्या पक्षामुळे आणि श्रीरामलु यांच्या पक्षामुळे भाजपच्या मतांमध्ये मोठी फाटाफूट झाली होती. ती यावेळी झाली नाही. गेल्यावेळी भाजपला सुमारे 20 टक्के मते होती. तर येडीयुरप्पा यांच्या पक्षाला सुमारे 10 टक्के आणि श्रीरामलु यांच्या पक्षाला सुमारे 3 ट्कके मते होती. हे दोन्ही पक्ष यावेळी भाजपमध्ये विलीन झाले होते. त्यामुळे त्यांच्या मतांची एकत्रीत बेरीज ही सुमारे 33 टक्के होते. यावेळी पक्षाला 36टक्के मते मिळाली. म्हणज्येच थोडक्यात पक्षाची केवळ 3 टक्के मते वाढली असंच म्हणावं लागेल. त्याससोबत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सुमारे 43 टक्के मते आणि 17 जागांवर विजय मिळाला होता. त्याच्याशी या मतांची तुलना केली तर पक्षाची मते तब्बल 7 टक्क्याने घटली आहेत.

जेडीएसच्या गेल्यावेळी 40 जागा होत्या. यावेळीही 40 च राहिल्या आहेत. मतांच्या टक्केवारीत मात्र घट झाली आहे. गेल्यावेळी जेडीएसला सुमारे 20 टक्के मते होती. यावेळी 2 टक्याने घट झाली. यावेळी पक्षाला केवळ 18 टक्के मते मिळाली आहेत. यावेळी बसपा आणि एमआयएम या पक्षांनी जेडीएसला पाठिंबा देऊनही त्यांच्या जागा वाढल्या नाहीत उलट मतांची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणज्ये सर्वच पक्षांना जमीनवर आणणारा निकाल आहे असंच म्हणावं लागेल.

कर्नाटकाची अंतिम आकडेवारी  (2018)

पक्ष       जिंकलेल्या जागा       मतांची टक्केवारी

भाजप       104                36.20

काँग्रेस       78                 38.00

जेडीएस –    37                 18.30

इतर          3

2013 मधील आकडेवारी

पक्ष        जिंकलेल्या जागा     मतांची टक्केवारी

भाजप        40               19.89

काँग्रेस       122              36.59

जेडीएस       40               20.19

केजीपी         6               09.70

बीएसआर काँग्रेस – 4             02.69

इतर         12

लोकसभा 2014

पक्ष       जिंकलेल्या जागा      मतांची टक्केवारी

भाजप –  17                   43. 37 टक्के

काँग्रेस –  09                   41.15  टक्के

जेडीएस – 01                    11.07 टक्के

आकडेवारी सौजन्य – भारतीय निवडणूक आयोग

COMMENTS