बारामती – देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपनं पवार काका पुतण्यांना त्यांच्या काटेवाडी गावात आव्हान देण्याचा प्रय़त्न निष्फळ ठरला आहे. काल झालेल्या मतदानानंर काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये 16 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला आहे. एका जागेवर राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. तर विरोधकांना केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. सरपंचपदीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवानीमाता पॅनलचे उमेदवार विद्याधर काटे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप रासप युतीच्या लोकशाही ग्रामविका पॅनलचे पांडुरंग कचरे यांचा पराभव केला.
शरद पवार आणि अजित पवार यांचं गाव असलेल्या काटेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणुक दरवेळी बिनविरोध व्हायची. यंदा मात्र केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपनं रासपच्या मदतीने पवार काका पुतण्यांना आव्हान देण्यासाठी निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. सरपंचपदासह सर्व जागांवर उमेदवार दिले. गावातील जातीची समिकरणे पाहून ही निवडणुक राष्ट्रवादीला काही प्रमाणात जड जाईल असं बोललं जातं होतं. मात्र निकालानंतर विरोधकांचं आव्हान हवेतच विरल्याचं स्पष्ट झालं आहे. एक तृतीय पंथी उमेवारही सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होता. पवारांच्या गावात निवडणूक लागल्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं.
दरम्यान आज बारामती तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचेही निकाल हाती लागले आहेत. तालुक्यात झालेल्या 15 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 14 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर पारवडी या ग्रामपंचातीची सत्ता भाजपने राखण्यात यश मिळवलं आहे.
COMMENTS