नागपूर – राष्ट्रीय स्वसंयसेवक संघाने आज आयोजित केलेल्या बौद्धीकला भाजपचे दोन नाराज नेते गैरहजर राहिल्याने उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विदर्भातील नाराज आमदार आशिष देशमुख यांनी संघाच्या कार्यक्रमाला दांडी मारली. दरम्यान दोन्ही आमदारांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचं पक्षाचे विधानसभेतील प्रतोद राज पुरोहित यांनी स्पष्ट केलं आहे.
दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान संघाकडून अशा प्रकराचं बौद्धीक घेतलं जातं. त्याला पक्षाचे सर्व आमदार हजर असतात. आजही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह बहुतेक आमदार हजर होते. जे काही गैरहजर होते त्यांनी त्याबाबत पक्षनेतृत्वाला कळवलेलं आहे. मात्र खडसे आणि देशमुख हे काहीही न कळवता या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे उलट सुलट राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
मंत्रिपद गमावल्यापासून एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. वेळोवेळी ते जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवतात. या अधिवेशनातही अनेक मुद्यावरुन त्यांनी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. काल नारायण राणे यांनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यंत्र्यांनीही त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे खडसेंच्या नाराजीत आणखी भर पडली असण्याची शक्यता आहे. पक्षासाठी 40 वर्षांपासून कष्ट करुन बाहेरुन येणा-या राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने खडसे अधिकच नाराज झाले आहेत अशी चर्चा आहे.
दुसरीकडे विदर्भातील भाजपचे आमदार आशिष देशमुख हेही पक्षावर गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. विदर्भातील प्रश्नांकडे आणि शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकार चांगले लक्ष देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. दोन वेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता तर दोन्ही नेत्यांनी थेट संघावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष त्यांच्याविषयी काय भूमिका घेतो आणि पक्षाच्या नोटीसीला हे दोन्ही नेते काय उत्तर देतात याकडे पहावं लागेल.
COMMENTS