पुणे – माजी गृहराज्यमंत्री आणि जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यावर मंगळवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी यावेळी सर्वांतर्फे सामूहिक श्रद्धांजली वाहिली. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता साने गुरुजी स्मारक येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हासदादा पवार, लेखक श्रीपाल सबनिस, अंजली आंबेडकर, अंकुश काकडे, असीम सरोदे, बाबा आढाव, सुनीती सू. र. विश्वंर चौधरी, प्रविण सप्तर्शी यांच्यासह चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.भाई वैद्य यांचे वयाच्या 90 व्या वर्षी सोमवारी रात्री 9 वाजता प्राणज्योत मालवली होती. भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. या ठिकाणीच उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी मंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र ‘भाई वैद्य’ याच नावाने परिचित होते. शालेय जीवनातच १९४२च्या चलेजाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या आंदोलनात त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि तुरूंगवास भोगला होता. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला होता. कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी तब्बल २५ वेळा कारावास भोगला होता. अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.दरम्यान भाई वैद्य यांच्या निधनामुळे समाजवादी आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
COMMENTS