…त्यामुळेच सदाभाऊंना सगळीकडे हिरवेगार दिसते – राजू शेट्टी

…त्यामुळेच सदाभाऊंना सगळीकडे हिरवेगार दिसते – राजू शेट्टी

लातूर – गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पोस्टमार्टेम केल्याशिवाय मदत मिळणार नाही असे सांगितल्याने शेतक-यांची मृत जनावरे तीन दिवसांपासून गावात घरासमोर गोठ्यात पडलेली आहेत, त्यांचे अद्याप पोस्टमार्टम झालेले नाही, इतकी भयावह परिस्थिती या सरकारनं निर्माण केलीय, राज्यातल्या बळीराजाला त्रास देणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी तंबी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी डोळ्यावर हिरवा गॉगल घातल्यानं त्यांना सगळीकडे आनंदीआनंद आणि शेतीमध्ये हिरवेगारपणा दिसत असल्याची टीकाही त्यांनी नाव न घेता केली आहे. ते लातूरमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते.

दरम्यान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर २०१४ साली विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यातील दाभडी गावात  शेतकऱ्यांसोबत “चाय पे चर्चा” करत एकही आत्महत्या होणार नसल्याची ग्वाही पंतप्रधांनांनी दिली होती. मात्र त्यांची पाठ,फिरताचं आज त्या गावांत शेतकऱ्यांच्या डझनभर आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर मोदीच नाही तर साधा भाजपचा लोकप्रतिनिधीही फिरकला नाही, इतकं सरकार फसवेगिरी करणारं आहे. आता म्हणे पंतप्रधान शेतीक्षेत्रातल्या तज्ञांना घेऊन समस्या सोडवण्यासाठी  “खेती पर चर्चा” असा  उपक्रम राबवणार असल्याची चर्चा आहे, आता हे पाऊल म्हणजे लबाडीचा पुढचा टप्पा असल्याचंही खासदार शेट्टी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले. राज्यातील शेतकरी संघटनांचे विभाजनामुळे तुकडे झाले आहेत, त्यामुळे  निदान शेतकऱ्यांना चांगला संघर्ष करणारा शेतकरी नेता तरी निवडायला वाव मिळतोय ना? असं शेट्टी म्हणाले.

गारपिटीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.सरकारनं शेतकर्‍यांना तातडीने व भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. बागायती पिकांसांठी एकरी २५ हजार आणि जिरायती पिकांसांठी एकरी १५ हजार तातडीनं द्यावी आणि अजून काही भागात पंचनामे सुरु नसल्याच्या तक्रारी येत आहेत, तिकडेही सरकारनं लक्ष द्यावे, असं शेट्टी म्हणाले आहेत. भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढल्याशिवाया हे सरकार वठणीवर येणार नाही, असा ईशाराही खासदार शेट्टी यांनी त्यावेळी दिला आहे.

COMMENTS