लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची कसोटी, 8 पराभवानंतर आता  ‘या’ 3 जागा तरी राखणार ? कशी आहे राजकीय परिस्थिती ? वाचा सविस्तर

लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची कसोटी, 8 पराभवानंतर आता ‘या’ 3 जागा तरी राखणार ? कशी आहे राजकीय परिस्थिती ? वाचा सविस्तर

देशभरातली 4 लोकसभा आणि 10 विधानसभा निवडणुकीसाठी काल निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सार्वत्रिक निवडणूक केवळ 1 वर्षावर आली असताना या पोटनिवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपची आणि मोदी सरकारची कसोटी या पोटनिवडणुकांमध्ये लागणार आहे. कारण गेल्या चार वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्य भाजपला तब्बल 8 ठिकाणी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भाजपची 2014 मध्ये 282 खासदारांची संख्या 8 ने कमी होऊन ती सध्या 274 वर आली आहे. 2014 मध्ये मोठ्या फरकाने जिंकलेल्या पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यातील जागांवर भाजपला पोटनिवडणुकीमध्ये सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळेच आता भाजपची खरी कसोटी लागणार आहे.

या चार जागांपैकी नागालँडमधील एक जागा, महाराष्ट्रातील दोन जागा तर उत्तर प्रदेशातील एक जागा अशा चार जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पालघर या मतदारसंघाचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचा मृत्यू झाल्यामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. भंडारा गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजप आणि मोदींवर हल्लाबोल करत खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघाचे भाजपचे खासदार हुकुमसिंह यांचा मृत्यू झाल्यामुळे इथं निवडणुक लागली आहे. तर नागालँडमध्ये तिथल्या खासदाराची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तिथे पोटनिडणूक होत आहे. त्यापैकी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील 2 अशा तीन जागा यापूर्वी भाजपच्या ताब्यात होत्या. या तीनही जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे. कारण या तीनही ठिकाणची परिस्थिती 2014 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बदलली आहे.

उत्तर प्रदेशातील कैराना हा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसात कैराना हे देशभरात चांगलचं चर्चेत होतं. मुस्लिमांच्या दादागिरीमुळे इथून हिंदू लोक स्थलांतर करीत असल्याचा आरोप भाजपचे दिवंगत खासदार हुकुमसिंग यांनी केला होता. त्यानंतर देशभर त्याची चर्चा झाली. जाट समूदाय आणि मुस्लिमांमध्येही तिथे दंगल झाली होती. त्यामुळेच हा मतदारसंघ अत्यंत संवदेनशील समजला जातो. या मतदारसंघात मुस्लिम, जाट, गुज्जर आणि दलित मतदारांची संख्या लक्षणिय आहे. 2014 मध्ये हिंदु मतांचं एकत्रिकरण झाल्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून हुकुमसिंग जिंकले होते. तर सपा, बसपा आणि आरएलडी यांच्या उमेदवारांमुळे विरोधी मतांमध्ये मोठी फाटाफूट झाली होती.

यावेळी मात्र कैरानाची समिकरणे काही प्रमाणात बदलली आहे. सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांची विभागणी टळणार आहे. राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष अजित सिंग यांचा मुलगा जयंत चौधरी या मतदारसंघातून इच्छुक आहे. चौधरी यांना तिकीट मिळाल्यास राष्ट्रीय लोकदलही सपा आणि बसपा आघाडीत सामिल होऊ शकतो. सपा बसपा या मतदारसंघातून हिंदू उमेदवार देण्याच्या विचारात आहेत. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये मुस्लिम उमेवार तिथून निवडूण येऊ शकला नाही. हुकुमंसिंग हे गुज्जर होते. त्यांच्या मुलीला भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुज्जर मतदारांची सहानभूती भाजप उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाट उमेदवार देण्याचाही विचार सपा बसपाकडून केला जात आहे. तसे झाल्यास राज्यात एक वेगळा सामाजिक संदेश जाईल असाही यामगे हेतू असू शकतो. केंद्र आणि योगी सरकारवरील काही प्रमाणात सुरू झालेला रोष आणि विरोधी मतांची किती एकजूट होते यावरच इथंल गणित अवलंबून आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील पालघर आणि भंडारा गोंदिया हे मतदारसंघ टिकवणेही भाजपसाठी फारसं सोपं नाही. केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील वातावरण आणि मित्र पक्ष शिवसेना  यांनी घेतलेला स्वबळाचा नारा यामुळे युतीच्या मतांमध्ये मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. दुसरीकडे दोन्ही ठिकाणी आघाडी होणार हे निश्चित आहे. मात्र ती किती मनापासून होते यावरच दोन्ही ठिकाणचे निकाल अवलंबून आहेत.

COMMENTS