मुंबई – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५२.९७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. राज्यातील हा अखेरचा टप्पा असून यात मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण, नंदुरबार, धुळे, दिंडोरी मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं आहे.
दरम्यान मुंबईतील उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा, उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर विरुद्ध काँग्रेसच्या संजय निरुपम, उत्तर-मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात लढत होत आहे. ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिल्यामुळे मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होत आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजप आपली जागा राखणार का हे पाहणं गरजेचं आहे.
तसेच पुण्यातील मावळमध्ये पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे अशी लढत होत आहे. तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांविरोधात अभिनेते आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंनी आव्हान उभं केलं आहे. तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या लढतींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS