मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काही मतदारसंघ चांगलेच गाजत असल्याचं दिसत आहे. त्यापैकीच माढा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यावरुन शिवसेना -भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि भाजपकडून रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता माढ्यातून आणखी एका नेता अपक्ष निवडणूक लढवणार आहे. ‘टॉयलेट मॅन’ म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान माढा मतदार संघातल्या माण तालुक्यातील लोधवडे हे रामदास माने यांचे मूळ गाव आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक असा त्यांचा मोठा प्रवास राज्यातील लोकांनी पाहिला आहेत. त्यांचा जन्म लोधवडे येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. गावी केवळ कोरडवाहू शेती असल्यामुळे ते नोकरीसाठी पुण्यात आले. तिथे त्यांनी सुरुवातीला लहानसा उद्योग सुरु केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी जगातले सर्वात मोठे थर्माकॉल तयार करणारे मशीन बनवले.
संपूर्ण भारतात आणि जगभरातील 45 देशात माने थर्माकॉल बनवण्याचा प्लान्ट, मशीनरीसह थर्माकॉल निर्यात करतात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून देशातल्या 17 राज्यांमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 हजार टॉयलेट्स पुरवली आहेत. माने यांनी 25 नववधूंच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता.
माढ्याचा विकास करण्याचे ध्येय घेऊन माने लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. पेनाची निब हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS