“चित्रा वाघ यांचा मतलबी कांगावा !”

“चित्रा वाघ यांचा मतलबी कांगावा !”

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याविषयी असभ्य शेरेबाजी करणाऱ्या व्यक्तीने आपली चूक जाहीरपणे कबूल केली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्या व्यक्तीची बाजू घेणे आणि मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणे हा मतलबी कांगावा आहे, अशी टीका भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी केली.

खासदार प्रीतम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या व्यक्तीला नंतर आपली चूक लक्षात आली व आपण केलेली चूक मोठ्या मनाने माफ करावी, अशी जाहीर विनंती या शिक्षक व्यक्तीने केली. तसेच यापुढे आपण कधीही राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांच्याविषयी काहीही चुकीची शेरेबाजी करणार नाही, अशी हमी त्या व्यक्तीने फेसबुकवरून जाहीरपणे दिली. तरीही चित्रा वाघ यांनी या विषयाचे भांडवल करून मा. पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्याचा मतलबी प्रयत्न केला, असे ॲड. माधवी नाईक यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, संबंधित व्यक्ती माफी मागत असतानाचा व्हिडियो चित्रा वाघ यांनी स्वतःच फेसबुकवरून प्रसिद्ध केला असूनही त्या मा. पंकजा मुंडे यांच्यावर टीका करून कांगावा करत आहेत, हे विशेष आहे. स्वतः चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आणि दुसऱ्यावर शेरेबाजी करायचा हा मतलबीपणा आहे. संबंधित व्यक्तीने भाजपा खासदारावर अश्लील शेरेबाजी केल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारणे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या संतापाला मोगलाईची उपमा देणे ही कोणती संस्कृती आहे, याचा चित्रा वाघ यांनीच जाब द्यावा.

COMMENTS