मुंबई – स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र हे देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील ९ शहरांना स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला असून, देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी झालेल्या संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांसह त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले आहे. स्वच्छ भारत अभियानातील राज्यातील शहरांचे यश हे उत्साहवर्धक असून याअंतर्गंत शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात लक्षणीय काम झाले आहे. महाराष्ट्र हे देशात स्वच्छतेत लवकरच अव्वल क्रमांक गाठण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील ९ शहरांना स्वछता पुरस्कार
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ९ शहरे स्वच्छ शहरे ठरली असून यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वछता पुरस्कार जाहीर झाला आहे तर ३ शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असल्याचे श्री पुरी यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्वच्छ सर्वेक्षण मिशन चे संचालक बी.के जिंदल उपस्थित होते.
नागपूर शहराला ‘नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली’चा पुरस्कार
नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील‘नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली’ असणारे शहर ठरले आहे. तर नवी मुंबई हे शहर ‘घन कचरा व्यवस्थाना’त देशातील सर्वोत्तम ठरले आहे.
परभणी ठरले ‘नागरिक प्रतिसादा’त देशात अव्वल
मराठवाड्यातील परभणी हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात‘नागरिकांच्या प्रतिसादा’त उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई शहराला स्वच्छता पुरस्कार
राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरांना स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वछ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे. भुसावळ शहरास ‘गतिमान’लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्राला विभागस्तरीय ३ पुरस्कार
देशातील विभागनिहाय पुरस्कारात महाराष्ट्राला पश्चिम विभागात ३ पुरस्कार जाहीर झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पंचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट ‘स्वच्छ शहरा’चा पुरस्कार जाहीर झाला आहे.‘नागरिक प्रतिसादा’च्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट या शहराला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला ‘नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली’चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
COMMENTS