मुंबई : देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर अतिशय जलद गतीने वाढत आहेत. याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. सततच्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज रस्त्यावर उतरून इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले.
सातत्याने होत असलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ विश्वासघात आंदोलन’ केले. हे आंदोलन राज्यव्यापी असून महाराष्ट्रात प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हे आंदोलन एकाचवेळी घेण्यात आले. रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सामान्य नागरिकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.
अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विश्वासघात आंदोलनात’ नेतृत्व करताना केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार टीका केली. “सबका साथ, सबका विकास चा नारा देऊन मोदींनी २०१९ साली दुसऱ्यांदा सत्ता हातात घेतली. इंधन आणि घरगुती गॅसचे दर कमी होतील हेही आश्वासन त्यांनी दिले होते परंतु सत्तेवर आल्यापासून सतत इंधनाचे दर वाढवले . इतर बाबतीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केला म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने याविरोधात विश्वासघात आंदोलन केले.
मोदींनी सत्तेत येण्यासाठी प्रत्येक वर्गाला आश्वासने देऊन त्यांची मते घेतली आणि सत्तेत आल्यावर मात्र विश्वासघात केला. पहिल्यांदा वापरून घ्यायचं आणि नंतर विश्वासघात करायचा, ही मोदींची जुनी सवय आहे. मोदी हे आता सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे ऐकून सुद्धा घेत नाही. म्हणूनच महाराष्ट्र युवक काँग्रेसला रस्त्यावर यायची गरज पडली असे सत्यजीत तांबे म्हणाले.
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात लोकशाही होती. तेव्हा अमिताभ बच्चन, अक्षय़ कुमार आदी सेलिब्रिटी सरकारला ट्विट करून प्रश्न विचारत होते. विविध प्रश्नांनी लोक त्रस्त असताना मोदी सरकारच्या काळात एकाही सेलिब्रेटी ट्विट करीत नाही. आयकाॅन असलेले लोक गप्प आहेत. पेट्रोलियम मंत्री संसदेत इंधन दरवाढ आमच्या हातात नाही, असे सांगतात. मग तुम्हाला खुर्चीवर का बसवले आहे, असा सवाल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी केला.
COMMENTS