माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच!

माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच!

बीड – आगामी विधानसभा निवडणुकीवरुन राज्यातील वातावरण तापत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबतच शिवसेना-भाजप युतीही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. बीडमधील सहा पैकी जवळपास पाच जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे. बीड, गेवराई, केज, परळी, माजलगाव या पाच मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. यामध्ये बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाशदादा सोळंके, परळीतून धनंजय मुंडे तर केजमधून नमिता मुंदडा, यांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून प्रकाशदादा सोळंके यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे याठिकाणी सोळंके यांच्याविरोधात भाजपत़ून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरु आहे. कारण याठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. भाजपचे विद्यमान आमदार आर टी देशमुख आणि भाजप नेते रमेश आडसकर यांच्यात सध्या उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.

आर टी देशमुख

आमदार आर टी देशमुख निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. मतदारसंघात त्यांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे.विशेष म्हणजे आर टी देशमुख यांनी यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. आजपर्यंत पक्षासाठी दिलेलं योगदान ध्यानात घेऊन पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल अशी अपेक्षा त्यांना आहे.

रमेश आडसकर

तर मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये आलेले रमेश आडसकर यांना पक्ष नेतृत्व आपल्यालाच उमेदवारी देईल असा विश्वास आहे. पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून ज्या निवडणुका झाल्या तसेच पक्षामार्फत जेवढे उपक्रम झाले त्यात त्यांनी भरीव योगदान दिलं आहे. गेली 20 वर्षांपासुन तो राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे भाजप आपल्यालाच उमेदवारी देईल असा दावा आडसकर यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकी भाजपडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS