शेवटाची सुरुवात करुन दिल्याबद्द्ल सप-बसपचे आभार – ममता बॅनर्जी

शेवटाची सुरुवात करुन दिल्याबद्द्ल सप-बसपचे आभार – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत गेला असल्याचं दिसून येत आहे. गोरखपूर आणि फूलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत भापजचा दारुण पराभव होणार असल्याचं दिसत आहे. कारण दोन्ही जागांवर सप आणि बसपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपच्या या पराभवावर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे तसेच सप आणि बसपचा ‘हा मोठा विजय असून शेवटाची सुरुवात करून दिल्याबद्दल मायावतीजी आणि अखिलेश यादवजी यांचे अभिनंदन’ करत असल्याचं ममताजींनी म्हटलं आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्य यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. गोरखपूरमधून समाजवादी पार्टीचे प्रविणकुमार निषाद आघाडीवर आहेत. तर फूलपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचा उमेदवार आघाडीवर आहे. तर बिहारमधील अररिया या मतदारसंघात नितीशकुमार आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी लालू प्रसाद यांच्या पक्षाचा उमेदवार सुमारे 21 हजार मतांनी आघाडीवर आहे. दोन विधानसभा मतदारसंघापैकी 1 मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे.

गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. 1998 पासून ते या मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडूण आले आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते मोठ्या फरकाने जिंकले होते. त्यावेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते भाजपला मिळाली होती. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यनंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे तिथे निवडणूक घेण्यात आली. इथ पराभव झाल्यास हा भाजपसाठी, योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा धक्का असेल. तर दुसरीकडे फूलपूरमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी राजीनामा दिल्यामुळे तिथेही पोटनिवडणूक घेण्यात आली. तिथेही भाजपचा मोठा पराभव होण्याची शक्यता आहे.

दरम्यान त्रिपुरातील विजयानंतर भाजप समर्थकांकडून आता प. बंगाल जिंकण्याची तयारी सुरू झाल्याचे दावे करण्यात आले होते. त्यावर तृणमूलच्या नेत्यांनी भाजप समर्थकांना एवढ्या विजयाने हुरळून जाऊ नका असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात सप-बसप एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच मतदार संघात भाजप उमेदवाराचा पराभव होणार हे स्पष्ट झाल आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS